वागळेंवरील हल्ला वृत्तपत्रांनी केला 'डाऊनप्ले'
२१ नोव्हे./मुंबई
आयबीएन-लोकमतच्या मुंबई आणि पुणे कार्यालयावर काल, शुक्रवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी मराठी प्रिंट मीडियाने अत्यंत बोटचेपी भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे. एकंदर पत्रकारावर झालेला हल्ला, ही त्या पत्रकाराची वा वृत्तपत्र किंवा वाहिनीची वैयक्तिक बाब असल्याप्रमाणे वागण्याची मराठी पत्रसृष्टीची परंपरा आहे. आयबीएन-लोकमतच्या प्रकरणातही त्यांची हीच 'ऐतिहासिक' भूमिका कायम असल्याचे दिसून आले आहे.
आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध गेल्या काही दिवसांपासून गरळ ओकत असल्याने शिवसैनिकांच्या संतापाचा स्फोट झाला व त्यांनी वाहिनीच्या कार्यालयावर हल्ला केला, असे सामनाने म्हटले आहे. या हल्ल्यात वाहिनीचे संपादक निखिल वागळे, त्यांचे सहकारी चंद्रकांत पाटील, अजय परचुरे, श्री. चव्हाण आदींना मार लागला. कार्यालयाचेही मोठे नुकसान झाले. वाहिनीच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी महिलांशीही गैरवर्तणूक केली. विशेष म्हणजे वाहिनीच्या पत्रकारांनी या हल्लेखोरांचा मोठ्या धैर्याने मुकाबला केला. त्यातील सात जणांना चोप देऊन नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. सामनाच्या वृत्तानुसार त्यातील तीन जणांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या हल्ल्यामुळे संपूर्ण पत्रसृष्टी हादरून गेली. अनेकांनी ताबडतोब हल्ल्याचा निषेध केला. मात्र खेदाची बाब म्हणजे अनेक पत्रकारांना या घटनेमागील गांभीर्यच समजले नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात काही पत्रकारांशी संवाद साधला असता, अनेकांनी 'बरे झाले, वागळेला चोपले', 'वागळेला हेच हवे असते' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिवसेनेविरोधात नेहमी बोलायची वागळेला काय गरज आहे, अशीही एक भाबडी प्रतिक्रिया एका वरिष्ठ पत्रकाराने व्यक्त केली. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्तासारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी या हल्ल्याची बातमी 'डाऊनप्ले' केली.
अशा प्रतिक्रियांमागे काय लॉजिक असावे, असे विचारले असता एका वरिष्ठ पत्रकाराने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले, की "सर्वसामान्यतः मराठी वृत्तपत्रांतील पत्रकार हे मध्यमवर्गातून आलेले असतात. हिंसा जोपर्यंत आपल्या घराच्या पावठाण्याजवळ येत नाही, तोपर्यंत त्यांना हिंसेचे मोठे आकर्षण असते. कोणत्याही प्रकारच्या सत्तेच्या विरोधात सहसा जायचे नाही, असा त्यांचा बाणा असतो. सत्ताधा-यांना जोपर्यंत सोयीचा असतो, तोपर्यंतच त्यांचा बाणेदारपणा, त्यांचा परखडपणा, त्यांची आक्रमकता चालत असते. अशावेळी जेव्हा कोणी सातत्याने कोणत्याही प्रकारच्या सत्ता वा व्यवस्थेविरोधात आवाज उठवतो, तेव्हा तो पत्रकारांना नकोसा होतो. तो त्यांना त्यांचाच शत्रू वाटू लागतो. या शत्रूचा ते उपहासाने, टिंगलटवाळीने वा अनुल्लेखाने मुकाबला करून शौर्य गाजवतात. अण्णा हजारेंसारखा माणूस अनेक पत्रकारांच्या टिंगलीचा विषय असतो, तो यामुळेच. निखिल वागळेंबाबतही हेच होताना दिसत आहे."
अन्य एक पत्रकार म्हणाला, की निखिल वागळेंचे सर्वच काही बरोबर असते, असे मानण्याचे कारण नाही. पण त्यांच्यावर हल्ला करणे हे केव्हाही गैरच आहे. सामनाच्या या हल्ल्याच्या बातमीत, हल्ल्यानंतर वागळे थरथर कापत होते. त्यांची अक्षरशः फाटली होती, असे विधान आहे. त्याकडे निर्देश करीत, वागळेंवरील हल्ल्याचे समर्थन करणा-या पत्रकारांना, सामनाची पत्रकारिता, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषा मान्य आहे, असे समजावे काय, असा सवालही या पत्रकाराने केला. आज आयबीएन लोकमत जात्यात आहे, पण तुम्हीही सुपात आहात हे विसरू नका, असा सल्लाही या पत्रकाराने दिला.
दरम्यान, बापू आत्रंगे यांनी मात्र उपरोक्त विधान अमान्य केले. ते म्हणाले, बहुतांशी वृत्तपत्रांना अशा हल्ल्यांपासून घाबरण्याचे काहीही कारण नाही. कारण की ती अत्यंत निःपक्षपाती असल्याचे गेल्या निवडणुकीत पुरेसे सिद्ध झाले आहे. या वृत्तपत्रांनी सर्वच पक्षांकडून कव्हरेज पॅकेजेस घेतली होती!
बापू आत्रंगे यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महाराष्ट्राचे विचारांचे इंद्रिय बिघडल्याचेच यातून दिसत आहे, असे ते म्हणाले.
(या बातमीत कळते-समजतेशी बोललेल्या पत्रकारांची नावे जाणीवपूर्वक देण्यात आलेली नाहीत.- ब्लॉगएडिटर)
आयबीएन-लोकमत हल्ल्याप्रकरणी कोण काय म्हणते?
लोकमत - शिवसेनेच्या गुंडांना कोण रोखणार?(अग्रलेख)
सामना - मीडिया देव नव्हे! (अग्रलेख)
लोकसत्ता - दांडगाईचा निषेध (विशेष अग्रलेख)
पॅकेज न्यूज प्रकरणी प्रेस कौन्सिलची समिती
१८ नोव्हे./मुंबई
वृत्तपत्रीय नैतिकता, विश्वासार्हता, वाचकांप्रतीची बांधिलकी या सर्वांना हरताळ फासतानाच मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाची निर्मिती करणा-या पॅकेज न्यूज प्रकाराची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने गंभीर दखल घेतली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांतील पेड न्यूज प्रकाराचा अभ्यास करण्यासाठी प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती जी. एन. राय यांनी एका समितीची नियुक्ती केली आहे.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पॅकेज वा पेड न्यूजने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले होते. निवडणुकांचा काळ म्हणजे झोपडपट्टीतल्या लोकांचा, गरिबांचा कमाईचा काळ. हे लोक आपली मते विकून पैसे कमावतात आणि लोकशाही खड्ड्यात घालतात, अशा बातम्या आणि लेख एकीकडे छापताना वा प्रसारित करताना अनेक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांनी या दोन्ही निवडणुकांच्या गंगेत आपलेही हात धुवून घेतल्याचे सर्वांनीच पाहिले. तथाकथित प्रतिष्ठित वृत्तपत्रांचा, वाहिन्यांचा विश्वासार्हतेचा, निःपक्षपातीपणाचा बुरखा याच काळात फाटला. नंतर आपण त्यातले नव्हेच, असे सांगत त्या फाटलेल्या बुरख्याला टाके घालण्याचे प्रयत्नही काहींनी केले.
पेड न्यूज हा अर्थातच नवा प्रकार नाही. मराठीतील काही पुढारलेली वृत्तपत्रे तर त्यातही आघाडीवर असल्याचे लोकांचे मत आहे. त्यामुळे या निवडणुकीतील पॅकेज न्यूजविरोधात थोडीशी कुजबूज होऊन नंतर सर्व नेहमीप्रमाणे शांत होईल व मालक-संपादकमंडळी पुन्हा भ्रष्टाचार, गुन्हेगारी, ढासळती नैतिकता याविरोधातल्या लेखांनी रविवारच्या पुरवण्या सजवण्यास सज्ज होतील, असे वाटत असतानाच ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी या प्रकाराविरोधात तीव्र आवाज उठवला. मराठीतील ज्येष्ठ संपादक गोविंदराव तळवलकर यांनी त्यांना साथ दिली. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनीही मीडियाला या प्रकारावरून कानपिचक्या दिल्या.
कळते-समजतेला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार पी. साईनाथ यांनी 'तो' लेख लिहिण्यापूर्वी मराठीतील त्यांच्या परिचयाच्या काही पत्रकारांशी सखोल चर्चा करून माहिती घेतली होती. त्यानंतरही केवळ लेख लिहूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी पेड न्यूजचे पुरावेही गोळा केले. (त्यात मराठी वृत्तपत्रांतील बातम्यांच्या कात्रणांचाही समावेश आहे.) हे सर्व पुरावे त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांच्या सुपूर्द केले आहेत, असेही समजते.
या पार्श्वभूमीवर प्रेस कौन्सिलने पेड न्यूज सिंड्रोमच्या अभ्यासासाठी एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती देशभरातून पेड न्यूजसंदर्भातील माहिती गोळा करुन, त्याचा अभ्यास करून ही विषवल्ली उखडण्यासाठी कोणते उपाय योजावे लागतील, याची शिफारस करणार आहे. हैदराबाद येथे गेल्या सोमवारी (दि. १६) राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत बोलताना प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या. राय यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, काही प्रतिष्ठित, विश्वासार्ह व निःपक्षपाती वृत्तपत्रांनी पालिका निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरु केली असल्याचे वृत्त आहे.
वाङ्मयचौर्यप्रकरणी लोकमतचे दिलगिरीचे आश्वासन
१८ नोव्हें/मुंबई
सखी पुरवणीतील वाङ्मयचौर्याबद्दल लोकमतने दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती ब्लॉगर महेंद्र कुलकर्णी यांनी दिली. महेंद्र कुलकर्णी यांनी आपल्या काय वाटेल ते... या ब्लॉगमध्ये लिहिलेला एक लेख लोकमतच्या सखी पुरवणीत कोणतेही श्रेय न देता जसाच्या तसा प्रसिद्ध करण्यात आला होता. (आधीचे वृत्त येथे वाचा.)
श्री. कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी त्यांना लोकमतच्या नागपूर कार्यालयातून याविषयी फोन आला. त्यावेळी श्री. कुलकर्णी काही कामानिमित्ताने नागपूरमध्येच असल्याने संध्याकाळी ते लोकमतच्या कार्यालयात जाऊन संबंधित सहसंपादिकेस भेटले. संबंधित लेखाचे हस्तलिखित लोकमत कार्यालयात टपालाने आले होते. त्याखाली कोणाचीही सही नव्हती, असा खुलासा त्या सहसंपादिकेने केला असून, सखीच्या पुढील अंकात दिलगिरी प्रसिद्ध करण्याचे आश्वासन दिले आहे.
पत्रकारिता बदलली, बिघडली नाही! - प्रा. सुरेश द्वादशीवार
१७ नोव्हें./नागपूर
काळानुरूप पत्रकारिता व माध्यमे बदलली असली तरी ते बिघडलेले नाहीत. माध्यमांना व्यावसायिकता आणि ध्येयवाद यांचा ताळमेळ राखण्याचे आव्हान मात्र स्वीकारणे आवश्यक आहे. अतिव्यावसायिकता ही पत्रकारितेकरिता धोकादायक ठरणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी येथे केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालयालय आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने टिळक पत्रकार भवनात आयोजित राष्ट्रीय पत्रकारदिनानिमित्त कार्यक्रमात प्रा. द्वादशीवार बोलत होते. 'भारतीय प्रसारमाध्यमांचा बदलता चेहरा' या विषयावरील आयोजित परिसंवादात प्रा. किशोर महाबळ, आज तकचे ब्युरो चीफ मनीष अवस्थी, विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक अरुण गडकरी, ऍड. मुक्ता फडणवीस वक्ते म्हणून उपस्थित होते. माहिती महासंचालक भि. म. कौसल हेही या कार्यक्रमास उपस्थित होते.
दरम्यान, दैनिक युवाराष्ट्र दर्शनतर्फे दिला जाणारा लोकपत्रकारिता पुरस्कार सकाळचे समूह संपादक उत्तम कांबळे यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा या कार्यक्रमात भागवत लांडगे यांनी केली.
प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या भाषणाचा अंश :
माध्यमांचा चेहरा बदलला आहे, असे अजिबात वाटत नाही. या क्षेत्रात कालानुरूप बदल झाले आहेत. तसे बदल राजकारण आणि समाजकारणातही झाले आहेत. पत्रकारितेला लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी आजही वंदनीय आहेत, परंतु आजच्या संपादकांची तुलना लोकमान्य टिळक व आगरकर यांच्याशी होऊ शकत नाही. लोकमान्य टिळक यांच्या केसरी आणि महात्मा गांधींच्या हरिजनच्या श्रेष्ठतेला लोकांनी काय मोल दिले ते सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील एकात्मवादी पत्रकारिता आज होऊ शकत नाही. ध्येयवादी पत्रकारिता दरिद्री राहिली. आज ध्येयवादाला व्यावसायिकतेची जोड दिल्यामुळे वृत्तपत्रे टिकाव धरून आहेत. निव्वळ ध्येयवादावर वृत्तपत्र काढणे शक्य नाही. त्यामुळे व्यावसायिकतेची योग्य जोड देणे आवश्यक आहे. परंतु, अतिव्यावसायिकता ही पत्रकारितेसाठी घातक असून, त्यावर समाजाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. (सौजन्य - सकाळ)
'लोकमत'ने वाङ्मयचौर्य केल्याचा मुंबईतील ब्लॉगरचा आरोप
१७ नोव्हे./मुंबई
नाशिक येथील लोकमतच्या ५ नोव्हेंबरच्या सखी पुरवणीत प्रसिद्ध झालेला एक लेख आपल्या ब्लॉगसाईटवरून जसाच्या तसा उचलण्यात आला असून, आपणांस वा आपल्या ब्लॉगला त्या लेखाचे श्रेय देण्याचे सौजन्यही दाखविण्यात आलेले नाही, लोकमतने आपल्या कॉपीराईटचा भंग केला आहे, असा गंभीर आरोप मुंबईतील एक ब्लॉगर महेंद्र कुलकर्णी यांनी केला आहे.
'कळते-समजते'ला पाठविलेल्या एका ई-मेलद्वारे श्री. कुलकर्णी यांनी हा आरोप केला आहे. श्री. कुलकर्णी यांनी त्यांच्या 'काय वाटेल ते...' या ब्लॉगवर ७ मार्च २००९ रोजी 'स्त्रिया! त्यांच्या सोबत रहाणं मुश्किल, त्यांच्या शिवाय तर त्याहुनही मुश्किल!' या शीर्षकाचा एक लेख पोस्ट केला होता. हाच लेख नाशिक लोकमतच्या सखी पुरवणीत ५ नोव्हेंबर २००९ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. ते करताना त्याचा फक्त मथळा तेवढा बदलण्यात आला होता. 'आता तुम्हीच सांगा कसं वागायचं माणसानं? - एक पत्नीग्रस्त' असा मथळा त्यास देण्यात आला होता.
आपल्या मेलमध्ये कुलकर्णी यांनी म्हटले आहे, की वाङ्मयचौर्याची ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी लोकमतच्या संकेतस्थळावर असलेल्या ई-मेल पत्त्यावर लोकमतच्या संपादकांच्या नावे पत्र पाठविले. या लेखाचे लेखक आपण आहोत. ते श्रेय आपणांस मिळावे, अशी त्यांची मागणी होती. परंतु त्या पत्राची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी संपादकांना स्मरणपत्रही पाठविले. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. लोकमतचे मुख्य संपादक दिनकर रायकर यांनाही त्यांनी याविषयी कळविले आहे. (या सर्व मेलची कॉपी 'कळते-समजते'कडे आहे.)
लोकमतने आपल्या मागणीस वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे अखेर महेंद्र कुलकर्णी यांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे लोकमतने कॉपीराईटचा भंग केल्याबद्दलची तक्रार नोंदविली आहे.
'मीडियानेक्स्ट' : पत्रकारांची मीडिया कंपनी पुण्यात सुरु
१५ नोव्हे./मुंबई
नव्या युगातील प्रसारमाध्यमे, तसेच कॉर्पोरेट हाऊसेस, एनजीओज आदींच्या कन्टेन्टपासून कन्सल्टिंगपर्यंत सर्व प्रकारच्या माध्यमविषयक गरजा भागविणारी मीडियानेक्स्ट इन्फोप्रोसेसर्स या नावाची कंपनी पुण्यात अलीकडेच स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीने आपल्या काही क्लायन्ट कंपन्यांबरोबर कामही सुरु केले असल्याचे समजते.
ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे हे या कंपनीचे अध्यक्ष असून, श्री. अभय कुलकर्णी व्यवस्थापकीय संचालक, श्री. सुनिल गोखले कार्यकारी संचालक, तर श्री. अमित टेकाळे आणि गणेश कुलकर्णी हे संचालक आहेत.
नव आर्थिक व्यवस्था, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सहज उपलब्धता, त्यामुळे तयार होत असलेली एकाच वेळी आत्मकेंद्री आणि त्याचवेळी समूहलक्षी अशी सामाजिक रचना, डिजिटल डिव्हाईड हे सर्व ध्यानी घेऊनच यापुढील काळात प्रसारमाध्यमांना वाटचाल करावी लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पारंपरिक प्रसारमाध्यमेच नव्हे, तर ज्यांना कुणाला काही 'मेसेज' द्यायचा आहे, अशा सर्वांनाच हे बदल लक्षात घेण्याची गरज आहे. ही आवश्यकता ओळखून, इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रे, मासिके, वृत्तवाहिन्या यांनाच नव्हे, तर विविध कंपन्या, स्वयंसेवी संस्था आदींना साह्य करण्याच्या हेतूने या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. मराठी माध्यमक्षेत्रातील अशाप्रकारची ही पहिलीच कंपनी असावी.
'मीडियानेक्स्ट'विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
झी 24 तासमध्येही 'रिझाईन फ्लू'
१५ नोव्हें./मुंबई
झी 24 तास या वृत्तवाहिनीमध्ये 'रिझाईन फ्लू' घुसला असल्याचे वृत्त आहे. या वाहिनीचे राजकीय प्रतिनिधी नरेंद्र कोठेकर हे सध्या नोटीस पिरीयडवर असल्याचे समजते. पूर्वीच्या एका वरिष्ठ पत्रकाराचा जाच आणि राजकारण सहन न झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागत असल्याचे सांगण्यात येते.
तत्पूर्वी गेल्या महिन्यात श्री. तुळशीदास भोईटे यांनी या वृत्तवाहिनीचा राजीनामा दिला होता. त्यांच्यावर चॅनेलच्या घसरलेल्या टीआरपीचे खापर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच चॅनेलमधील काही वरिष्ठ आणि काही पोलिटीकल रिपोर्टसच्या राजकारणासही भोईटे वैतागले होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा देवून टीव्ही नाईनची वाट धरली, असे बोलले जाते. त्यानंतर असाईनमेंट डेस्कच्या सोनिया नारकर यांनी या वाहिनीस टाटा केला.
आयबीएनचे सुभाष शिर्के यांचा राजीनामा
१० नोव्हेंबर/मुंबई
सध्या मराठी मीडियामध्ये 'रिझाईन फ्लू'ने थैमान घातले आहे. आयबीएन-लोकमतचे वृत्तसंपादक सुभाष शिर्के हे या फ्लूचे नवे बळी ठरले असल्याचे समजते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे कळते.
मीडियाविश्वातील चर्चेनुसार, आयबीएन-लोकमतचे संपादक आणि फीचर एडिटर यांच्याशी झालेल्या तीव्र मतभेदांमुळे निवडणूक काळात श्री. शिर्के यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यानंतर अलीकडेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
धक्कादायक!
०५ नोव्हें./मुंबई
सकाळचे लीडर रायटर, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित, तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई टाइम्स पुरवणीचे संपादक सचिन परब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजते.
गेल्या चार-पाच दिवसांपासून वृत्तपत्रविश्वात या दोन्ही राजीनाम्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रशांत दीक्षित यांच्या राजीनाम्यामुळे सकाळने आंतरराष्ट्रीय घडामोडींबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणाचे साक्षेपी अभ्यासक, विश्लेषक गमावले आहेत. सकाळमधील अनेक वाचनीय अग्रलेख हे प्रशांत दीक्षित यांच्या लेखणीतून उतरलेले आहेत, हे अनेकांना माहित आहे. सकाळआधी त्यांनी लोकसत्ताचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून काम पाहिले होते.
सचिन परब यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या संकेतस्थळाला एक वेगळा चेहरा देण्याबरोबरच, या संकेतस्थळाच्या वाचकसंख्येत प्रचंड वाढही घडवून आणली होती. टीव्ही, वृत्तपत्र आणि इंटरनेट अशा तिन्ही माध्यमांमधील कामाचा अनुभव असलेल्या परब यांनी मटा ऑनलाइनमध्ये अनेक यशस्वी प्रयोग केले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची मुंटाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली होती.
वरिष्ठांशी असलेल्या तीव्र मतभेदांतून या दोघांनीही राजीनामा दिला, असे कळते.
मराठी वर्तमानपत्रांचं अधःपतन
"वृत्तपत्र वा प्रसारमाध्यम चालवायचं तर पैसा हवा, तो मिळवण्यासाठी या प्रकारच्या तडजोडी अपरिहार्य आहेत, अशा प्रकारचा दावा प्रसारमाध्यमं चालवणा-या कंपन्या आणि तिथे काम करणारे पत्रकार करतात. नैतिक मार्गांनी धंदा वा उद्योग करता येत नाही, असा हा युक्तिवाद आहे. नैतिकतेचा सतत नव्याने शोध घ्यावा लागतो आणि बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात त्यानुसार कायदेकानून, आचारसंहिता आणि वर्तणूक यामध्ये बदल करावे लागतात..."
विधानसभा निवडणुकीच्या काळात पॅकेज पत्रकारितेने हैदोस घातला होता. या काळात कधी नव्हे ती मराठी पत्रकारितेतील विश्वासार्हता रसातळाला गेली. वृत्तपत्र हे केवळ प्रॉडक्ट नसते, असे मानणारे अनेक लोक यामुळे अस्वस्थ आहेत, संतप्त आहेत. सध्या याविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी या अनुषंगाने वृत्तपत्रांच्या बिझनेस मॉडेलसंबंधी मांडलेले विचार, आपल्या विचारासाठी...
सुनील तांबे यांच्या मोकळीक या ब्लॉगवरील मराठी वर्तमानपत्रांचं अधःपतन हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वॉल स्ट्रीट जर्नलनेही भारतातील या पॅकेज पत्रकारितेचा 'समाचार' घेतला आहे. त्याविषयी गेल्या २० मे रोजी कळते-समजतेमध्ये वृत्तपत्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हांचे पॅकेज!या मथळ्याचा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. तो वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
स्टार माझा ठरली चर्चेतील वाहिनी
२ नोव्हें./मुंबई
स्टार माझा ही वृत्तवाहिनी सध्या पत्रविश्वातील कौतुकमय चर्चेचा विषय ठरली आहे.
कळते-समजतेकडे आलेल्या प्रतिक्रियांवरून, स्टार माझाच्या संयत, तरीही आक्रमक अशा पत्रकारितेवर प्रिंट मीडियातील अनेक पत्रकार खुश असल्याचे दिसून येते. विधानसभा निवडणूक वृत्तांकन, निकालांचे विश्लेषण यातही या वाहिनीने बाजी मारली होती. सत्यसाईबाबाच्या ढोंगीपणाचा पर्दाफाश करतानाच महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेस लांच्छनास्पद ठरणा-या घटना-घडामोडींचा समाचार घेणारे विशेष वृत्तांत, तसेच पॅकेज पत्रकारितेविरोधात या वाहिनीने घेतलेली ठोस भूमिका यामुळे ही वाहिनी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सत्यसाईबाबासारख्या प्रवृत्तींबाबत मराठी वृत्तपत्रांनी बाळगलेल्या संशयास्पद मौनाच्या पार्श्वभूमीवर स्टार माझाच्या त्याविषयीच्या बातम्या अधिकच उठून दिसल्या.
सकाळची एसएमएस सेवा आता सशुल्क
२ नोव्हें./मुंबई
आतापर्यंत मर्यादित लोकांसाठी मोफत असणारी सकाळची एसएमएस न्यूज अपडेट सेवा आता सशुल्क झाली आहे. या सेवेच्या नावनोंदणीस आजपासून (दि. २) सुरूवात झाली आहे. १ डिसेंबरपासून ती प्रत्यक्षात सुरू होईल.
सकाळने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार राज्यातील एक लाखाहून अधिक नागरिकांनी या सेवेसंदर्भात नावनोंदणीसाठी प्राथमिक माहिती या आधीच पाठविली असून, त्यांच्यापैकी 53 हजार ग्राहकांना ही सेवा मोफत देण्यात येत होती. या अंतर्गत दिवसभरात बातम्यांचे दोन एसएमएस पाठविण्यात येत होते. आता रोज पाच अपडेट देणारी सशुल्क सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठीचे शुल्क अर्धवार्षिक १९९ रुपये किंवा वार्षिक २९९ रुपये (सेवाकरासह) असे असेल.
'सकाळ'चे प्रदीपकुमार खिरे यांचा राजीनामा
३१ ऑक्टो./पुणे
सकाळ समूहाचे संचालक (न्यू प्रोजेक्ट्स) प्रदीपकुमार खिरे यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे समजते. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र वैयक्तिक कारणांसाठी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या काही सहका-यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले असल्याचे कळते.
गेल्या काही दिवसांपासून श्री. खिरे जवळजवळ रोज पुण्याहून सकाळच्या मुंबईतील कार्यालयात जात असत. तेथे ते साम टीव्हीची माहिती घेत असत. असे असताना अचानक त्यांनी सकाळ संस्थेस रामराम ठोकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
'पॅकेज पत्रकारिते’ची चौकशी व्हायला हवी
29 ऑक्टो./मुंबई
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वर्तमानपत्रांनी केलेल्या ‘पॅकेज पत्रकारिते’ने ज्येष्ठ पत्रकार आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक गोविंद तळवलकर व्यथित झाले असून या घृणास्पद प्रकाराची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
‘पॅकेज पत्रकारिते’वर ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी लिहिलेला एक लेख (The medium, message and money ) वाचल्यानंतर तळवलकर यांनी आपल्या एका सहकाऱ्याला पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ६० वर्षाच्या कारकीर्दीत मराठी पत्रकारितेची इतकी लांच्छनास्पद अधोगती झाल्याचे कधी पाहिले नव्हते. (प्रहार)
(पी.साईनाथ यांच्या लेखाचा अनुवाद स्टार माझाने प्रसिद्ध केला आहे. तो वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
